सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “पाखरू…—” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
माझ्या मनातल्या मनात …
दडलंय एक पाखरू इवलंसं .. भांबावलेलं ..
माझ्याबरोबरच जन्मलेल्या माझ्या स्वप्नांचं
माझ्याबरोबरच चालायला शिकलेल्या ..
माझ्या आशा – आकांक्षांचं …
केव्हाचं अधीर झालंय ते ..
आपले पंख फुलारून
विस्तीर्ण अवकाशात झेपावायला !!
पण …..
पण फसतोच आहे त्याचा प्रत्येक प्रयत्न..
पंख होरपळताहेत कधी ….
वास्तवाच्या प्रखर आचेनी
तर कधी झोडपले जाताहेत …
व्यवहाराच्या थंड, निर्मम फटकाऱ्यांनी ….
आणि मग …..
मग आणखी आणखीच सांदी-कोपऱ्यात
लपू पहातंय हे बिचारं इवलंसं पाखरू !
आताशा पण थंडावलीय जरा
त्याची स्वैर उडण्यासाठीची धडपड
मधूनच कधी ऐकू येते फक्त
त्याच्या पंखांची अस्वस्थ फडफड ……
कारण …..
कारण आता ते शहाणं झालंय ..
त्याला समजू लागलंय की …
की बाहेरच्यापेक्षा इथेच …
या मनातल्या मनातच ..
आपण जास्त सुरक्षित आहोत म्हणून !!!!!
समजलंय त्याला …….
☆
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈