मेहबूब जमादार
कवितेचा उत्सव
☆ अपेक्षांच्या वेलीवर… ☆ मेहबूब जमादार ☆
☆
अपेक्षांच्या वेलीवर समस्यांची फुले
स्वप्नांचा झोपाळा मुक्त हवेवर झुले ….
*
मोकळ्या हवेत उडत जाती पक्षी
पहा कशी नभात सुंदरशी नक्षी
आनंदाच्या तरंगी नाचती सारी मुले …..1
*
निसर्ग देतो सारे तरी सारे उणे
सारे असता मनी प्रश्नांचे तुणतुणे
का उठतो कल्लोळ सारे असे खुले …..2
*
कमी करा गरजा नाही लागत पैसा
रहा समाधानी जरी रिकामा खिसा
वठलेल्या झाडांना कशी येतील फळे …3
*
पाहिले परी हटेना क्षितीजावरिल धूळ
समजावले मना तरी धरून तेच खूळ
सारवले कितीदा तरी उखडून जाते खळे …4.
*
अपेक्षा आणि गरजांचा धरू नको राग
शांतवेल ज्वालामुखी निवळेल त्याची धग
मृग बरसता फुलतील आनंदाचे मळे…5
☆
© मेहबूब जमादार
मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली
मो .9970900243
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈