श्री उदय गोपीनाथ पोवळे
कवितेचा उत्सव
☆ सब घोडे बारा टक्के ! ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे☆
जितके बोके, तितके खोके
जितके डोके, तितके मोके
कोणी कट्टर, कोणी पंटर
कोणी मठ्ठ, कोणी सेटर
कोणी पडले, कोणी मधले
कोणी आपटले, कोणी सावरले
कोणी पक्के, कोणी फिक्के
सब घोडे बारा टक्के —-
त्याच त्याच, जुन्या घोषणा
तुम्हीच लढा, तुम्हीच मरा
जुन्या आशा, नवा जोश
जुन्या स्वप्नांना, नवा कोष
तुम्ही आमचे, करता करवते
आम्ही फक्त, आदर्श नेते
त्याच आमच्या, भूल – थापा
तुमच्या चरणी, आम्ही वाहता
जुने विसरुनी, मारता शिक्के
सब घोडे बारा टक्के —-
जिकडे सत्ता, तिकडे सरशी
जिकडे पैका, तिकडे वळशी
तुमचा चंदा, त्यांचा धंदा
तुमच्या गळी, त्यांचाच फंदा
पुन्हा पुन्हा, जुनाच स्वर
निवडुनी आणा आम्हां बरं
मारतात ते, चौके छक्के
सब घोडे बारा टक्के !—-
भातुकलीचा खेळ मांडला
अर्ध्यावरती डाव सांडला
पांढऱ्या खादीला हिरवा काठ
भगव्या झेंड्याला जातीचा शाप
मोकळा झाला तो रामलल्ला
हाताच्या साथीला अकबर अल्ला
धनुष्य बाण वेगळे झाले
घड्याळाचे काटे तुटले
बोलक्या मशालीत धग नव्हती
मुक्या तुतारीत हवाच नव्हती
इंजिनाच्या धुराने प्रदूषण वाढले
कमळाच्या कर्माने चिखलच केले
भांडत राहिले राजा राणी
प्रजेची मात्र अधुरी कहाणी
देतील अजुनी धक्के बुक्के
सब घोडे बारा टक्के —-
सब घोडे बारा टक्के
आपणच हे, ठरवू पक्के
आपले काम, आपण बरे
नका मानू, त्यांचे खरे
करा निश्चयी, स्व मना
देशविकास, हाच कणा
घेऊनी रिकीब आणि लगाम
घोडे दौडवू आपणच बेभान
आपलेच घोडे आपलेच टक्के
देशहितासाठी हेच करू पक्के
सब घोडे बारा टक्के !!!
सब घोडे बारा टक्के !!!!
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈