श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
☆ कवितेचा उत्सव ☆ आमराईतली पहाट ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
(माझ्या भावाने मला आमच्या आमराईतल्या पहाटेचा फोटो पाठवला होता. तो फोटो पाहून मला ही कविता सुचली.)
झाली पहाट पहाट
दिशा घरे शांत शांत
प्रभा फाकत फाकत
मित्र येई अंबरात
उगवला नारायण
आधी आला माझ्या राना
फैलावले स्रोत त्याने
श्वास आला पाना पाना
विविधरंगी सडा त्याने
अंबरी या सांडला
उजळूनी सुखावला
माझा सारा शेतमळा
दुरुनच दिसे मला
नाजुकशी पायवाट
आज वाटे हुंदडावे
मन मोकाट मोकाट
मोहरले झाड झाडं
जन्मा आले फळ
तनातूनी मनातूनी
येई सुखाची कळ
धुंद सारा आसमंत
मन भरल भरलं
माहेरीच्या सुखाला ग
मन आसावलं
परतुनी माझे मन
झेप घेई माहेरा
अन् वाटे हुंगावे
डोळे मिटून मोहरा
गर्द अशा आमराईत
असे दाट छाया
बघ आली मन भरून
माहेरची दाट माया
© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
कविता आवडली.