श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ मोर झाला… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
चांगला तो साव होता आज आहे चोर झाला
वाचताना बातमीही फार मोठा शोर झाला
*
संगतीला संत आले वागण्याला शिस्त आली
साधकांचा स्पर्शहोता कावळ्याच्या मोर झाला
*
फार मोठी चूक झाली वागताना तोल गेला
उधळला संसार तेव्हा बायकोचा घोर झाला
*
स्वार्थ साधायास त्याने सोडला अभिमान सरा
लाजमोडा त्या घडीला राबणारा ढोर झाला
*
जाहली साकार स्वप्ने गर्व तेव्हा फार केला
संकटानी घेरलेल्या वादळाचा जोर झाला
*
काय होतो काय झालो हे कळेना आज त्याला
चाचपाया दैव तेंव्हा तो बिचारा पोर झाला
*
वेगळा आवेग होता कल्पना घेऊन आला
एकता बांधावयाला संस्कृतीचा दोर झाला
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈