श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ मुग्धा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
☆
ही कोण शोडषा उभी नदीच्या तटी
न्याहळी समोरी कलती करुनी कटी
*
फडफडे पापणी टपोर डोळ्यावरी
गुंजतो भ्रमर जणू कमल परागावरी
*
ओठातच फुटले हास्य अडकले शब्द
धुंदला किनारा जणू जाहला स्तब्ध
*
भिरभिरे नजर अन् धडधडतो हा ऊर
पदराशी करीते चाळा वाटण्या धीर
*
आतूर नेत्र-एकाग्री लावली नजर
मुरलीने जाहली धुंद जणू ही नार
*
चमकुनी पाहते मागे पुढती कशी
वेलीवर डुलते कोमल कलीका जशी
*
पाहते लाजूनी सभोवती ना कुणी
पाकळ्या जाईच्या झडती ओठातूनी
*
घट रिता ठेऊनी पुढे खिन्न बैसली
इतक्यात मागुनी शीळ तिने ऐकली
*
ऐकताच खुणेची शीळ उठे शिरशिरी
भ्यालेली हरिणी दिसे जणू बावरी
*
हुरहूर गोड लागली शब्द ना स्फुरे
पाहूनी सख्याला जवळी भरे कापरे
*
ह्रदयात गुपीत गुंतले येईना ओठी
धुंदीत गोड स्वप्नीच्या मारीली मिठी
☆
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३