श्री उदय गोपीनाथ पोवळे

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रवास  – – ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे☆

होतो कुठे, आलो कुठे, काही कळेना

 हरलो का जिंकलो, काही उमजेना

*

जीवनाच्या प्रवासात चालत राहिलो

आलेल्या प्रसंगाशी लढत राहिलो

*

खाच खळगे, काट्या झुडपातून मार्गस्थ झालो

धडपडत, चाचपडत, पडून, उभा राहिलो

तरतरीत, टवटवीत होऊन ताजातवाना झालो

पुढे मखमली गालिच्या वरून चालत राहिलो

पण

गालिच्या खालची टोकेरी दगड टोचत राहिली

जमिनीवरच्या मातीची आठवण देत राहिली

*

काही प्रसंगी हरून जिंकलो

तर

काही प्रसंगी जिंकून हरलो

*

काही लढाया डोक्याने लढलो

तर

काही लढाया मनाने जिंकलो

*

डोक्याच्या लढायांना सर्व साथीला होते

मनाच्या लढायांना फक्त हृदयच

साक्षीला होते

*

काय कमवले, काय गमवले हिशोब जुळत नाही

काय जमवले, काय हरवले काहीच कळत नाही

*

सुख दुःखाच्या खेळामध्ये कठपुतळी झालो

नशिबाच्या लाटेवर तरंगत वहात राहिलो

*

सुख काय, दुःख काय, सारे सारखे वाटत गेले

त्याच्या पलीकडे जाऊन

माणूस होऊन, दुसऱ्यांसाठी, जगावेसे वाटत राहिले

*

होतो कुठे, आलो कुठे, काही कळेना

हरलो का जिंकलो, काही उमजेना

पण महत्वाचे

जीवनाच्या प्रवासात चालत राहिलो

सुखदुःखाच्या पलीकडे बघत राहिलो

आणि फक्त नी फक्त

आनंदाची देवाण घेवाण करत राहिलो

आंनदाची देवाण घेवाण करत राहिलो

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments