श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ अंगणासारखे… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

जगावे कधी मी मनासारखे?

कधी ग्रीष्म ही श्रावणासारखे

*

मला दुष्ट होता न आले कधी

जगा सोसले सज्जनांसारखे

*

उपाशीच अन् फाटका राहिलो

ऋतू हे जरीही सणासारखे

*

न छाया, सुगंधी फुले,ना फळे

जिणे लाभलेले तणासारखे

*

मिळो प्रेम किंवा उपेक्षा मिळो

करा प्रेम ओल्या घनासारखे

*

कुणासारखे मी असाया नको

असावेच मी ‘आपणा’सारखे

*

करंटेपणी भाग्य हे केवढे

मला बाळ हे ‘श्रावणासारखे’

*

मला द्यायचे मान्य केले जरी

दिले सर्व त्यांनी ‘पणा’सारखे

*

न बक्षीस..वा दान ही लाभले

मला जे मिळे ते ऋणासारखे

*

नको दार..वा चौकट्या..या मना

असावे खुल्या अंगणासारखे

*

जरी गोड त्यांचे  हसू… बोलणे

मना शब्द होते घणासारखे

*

मला टाळता लोक आले न ‘ते’

नकोश्याच होते क्षणांसारखे

*

नको श्रेष्ठता तारकांची मला

मिळो भाग्य धूलीकणासारखे

*

उराया नको होऊनी कोळसा

झिजावे तरी चंदना सारखे

*

कृतघ्ने जरी वागले सर्वही

मला वाटले अंजना सारखे

*

नसे स्त्राव नाही जरी वेदना

तुझे राहणे गे व्रणासारखे

*

असे निष्कलंकी प्रतीमा तुझी

तुला मानले दर्पणा सारखे

*

दिसाया जरी मी बटूसारखा

मला रूप ही वामनासारखे

*

मना..पावला भिंगरी लाभली

बसू मी कसे आसना सारखे?

*

इथे सर्व ठायी लढाई…लढे

पडे स्वप्न तेही रणासारखे

*

सुखाला गुरू..मंत्र नाही जरी

नसे सूख रे वाचनासारखे

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments