श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
☆ पहिला पाऊस ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
धारा कोसळता मृगाच्या
भेगाळल्या धरतीवर
मृदगंधाच्या गंधाने
जाई व्यापून चराचर
*
नाचे आनंदाने निसर्ग
झाडे वेली प्रफुल्लित होती
झटकून धूळ अंगावरची
वाऱ्यासवे डोलू लागती
*
ओहोळ सारे माथ्यावरले
आता होतील जलप्रपात
दरीत उतरून खळाळत
होतील समर्पित सागरात
*
अंग झटकून कासकर
लागे पेरणीच्या कामाला
ढवळ्या पवळ्या खुशीने
घेती जोडून नांगराला
*
पीक घेणार बळीराजा
यंदा शेतात सोन्याचे
विनवी प्रमोद प्रभूला
रक्षण करा धान्याचे
रक्षण करा धान्याचे
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈