☆ कवितेचा उत्सव ☆
☆ कोण चितारी ☆ सौ. सुरेखा कुलकर्णी ☆
☆
नील नभी बघ पूर्व दिशेला
अरुणाचा रथ सज्ज जाहला
फुटे तांबडं पहाट झाली
लाल केशरी रंग उधळला
*
प्राचीवरती आले नारायण
सुवर्ण किरणे पहा पसरली
चराचराला उजळून टाकी
हिरव्यावरती छटा पिवळी
*
ऊन कोवळे जरी हळदुले
रंगछटा ती गडद दाखवितो
कलिका उमलून फुले रंगीत
ऊन सावली खेळ रंगवितो
*
धरेवर येत सावल्या
अस्मानी तर रंगपंचमी
काळोखाच्या पार्श्वभूमीवर
क्षितिजावर नक्षी हो नामी.
*
कोण फिरवितो रंग कुंचला
चित्र चितारी सांज सकाळी
विश्व विधाता नमन तयाला
रंगांची दिसे सुंदर जाळी.
☆
© सौ. सुरेखा कुलकर्णी
सातारा
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈