सौ विजया कैलास हिरेमठ
कवितेचा उत्सव
☆ “कारण…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆
☆
निद्रस्थ स्तब्ध राहण्या अनेक कारणे
पेटून उठण्या एकच कारण पुरते ….
न करण्याची अनेक कारणे
करण्यासाठी फक्त एकच कारण असते..
दुःखाची अनेक कारणे
भर उन्हात एक झुळूक पुरते
अनेक संकटे मोठी असताना
सुखासाठी एकतरी कारण नक्की असते….
दोष देण्या अनेक कारणे
नाते सहज तोडू पाहते
जोडून राहण्या एकच कारण
प्रेमाने जग जिंकता येते….
अश्रूंसाठी अनेक कारणे
एकच कारण ओठावर हसू फुलवते
हार मानण्या अनेक कारणे
जिंकण्यासाठी एकच कारण असते….
जग हे मोठे,जगणे छोटे
पुरून येथे उरता येते
एक कारण जगण्याचे
मरणालाही परतून लावते…..
जीवन मरण इथे आपण शरण
तरीही जगण्याची एक आशा पुरते
दोन श्वासातील अंतर जीवन
त्या श्वासाची सोबतही अमूल्य इथे ठरते….
स्वप्न आणि ध्येयासाठी पळताना
सुख, शांती आणि समाधानच जिंकते
शोध त्या एक कारणाचा लागता
आयुष्य सहज सुंदर सोपे होते….
☆
💞शब्दकळी विजया 💞
© सौ विजया कैलास हिरेमठ
पत्ता – संवादिनी ,सांगली
मोबा. – 95117 62351
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈