महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 184
☆ अभंग… मैत्री ☆ महंत कवी राज शास्त्री ☆
☆
मैत्रीचे सु-सूत्र, अतर्क्य कठीण
घ्यावे समजून, अनुभवे.!!
*
वरवडे नको, मैत्रीचा दिखावा
सतत असावा, स्नेहभाव.!!
*
मैत्रीत नकोच, धन व्यवहार
असो सदाचार, ममत्वाचा.!!
*
छंदो-गामात्यांची, मैत्री आठवावी
मनी साठवावी, प्रेमादरे.!!
*
कनोज शाखेचा, कवी तो कलश
मैत्रीचा विशेष, त्याच्या ठाई.!!
*
मित्रत्व जपण्या, मृत्यू आलिंगन
वाहिले जीवन, मित्रासाठी.!!
*
संभाजी राजेंची, साथ नं सोडीली
रक्ताने लिहिली, मैत्री गाथा.!!
*
कविराज म्हणे, माझ्या जीवनात
ऐसा प्रत्यक्षात, मित्र यावा.!!
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈