सौ. अलका ओमप्रकाश माळी
कवितेचा उत्सव
☆ मैत्री… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆
तुझी माझी मैत्री
थोडी जगावेगळी..
तू शांत संयमी,
तर मी बडबडी..
तुझी माझी मैत्री
नात्यापलीकडली,
एकमेकांत गुंतलेली..
माझी दुःख, तुझी फुंकर
दुधात विरघळलेली जणू साखर..
तुझी माझी मैत्री
घट्ट रेशीम बंध..
विश्वास आणि प्रेमाचा
मलमली अनुबंध..
तुझी माझी मैत्री..
जणू सर पावसाची..
उन पावसात भिजून
इंद्रधनू फुलवणारी..
तुझी माझी मैत्री..
जणू चादर धुक्याची
गुलाबी थंडीत ही
जणू आभाळ पांघरलेली..
तुझी माझी मैत्री..
यशाची साथी
अपयशातही सदैव सोबती..
तुझी माझी मैत्री
शरदाचं चांदणं..
काळोख्या रात्रीत ही..
सदैव मनात फुलणं..
तुझी माझी मैत्री
कृष्ण अर्जुनासारखी..
प्रत्यक्ष न लढता ही
मार्ग दाखवणारी..
तुझी माझी मैत्री..
कर्ण दुर्योधनासारखी..
हार समोर असूनही
साथ न सोडणारी..
तुझी माझी मैत्री..
एकमेकांसाठी जीव देणारी..
अंधाऱ्या रात्रीत ही
न डगमगता सोबत चालणारी..
तुझी माझी मैत्री..
प्राजक्ताचा गंध जणू..
क्षणाच्या सहवासात ही..
सुगंधाने दरवळणारी..
तुझी माझी मैत्री
जणू ज्योत दिव्याची..
स्वतः जळून ही..
प्रकाश पसरविणारी..
तुझी माझी मैत्री..
चंदनाचे खोड जणू..
झिजता झिजता ही
शितलता देणारी..
तुझी माझी मैत्री..
प्रेम, विश्वास,राग, लोभ
ह्यांच्याही पलिकडली..
एकमेकांत विरघळून ही
स्वतःचं प्रेमळ अस्तित्व
अविरत जपणारी..
तुझी माझी मैत्री
म्हणजे वाळवंटातील पाणपोई
तहान भागवता भागवता पथिताची
स्वतः तृप्त होणारी..
तुझी माझी मैत्री
म्हणजे सावली वटवृक्षाची
सुखाच्या गारव्यात न्हाऊन ही
आनंदाने दुःख झेलणारी..
मैत्रीच्या ह्या नात्याला
दृष्ट न लागो कोणाची..
हेच एक मागणे असे मनी..
आभाळभर शुभेच्छांची
उधळण करते ह्या मैत्री दिनी..
© सौ. अलका ओमप्रकाश माळी
मोब. 8149121976
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈