डॉ. शैलजा करोडे
कवितेचा उत्सव
☆ “आरसा …—” ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
(अष्टाक्षरी कविता)
☆
प्रतिबिंब चेहर्याचे
कधी मोठे कधी छोटे
आरसाच दावितसे
कधी खरे कधी खोटे…
*
साक्षी तो वर्तमानाचा
भूतकाळी ना रमणे
नसे जमत कधीही
भविष्यात डोकावणे…
*
सुंदरता ती मनाची
नच दावितो आरसा
बाह्यरूपी सौंदर्याचे
प्रतिबिंबी कवडसा…
*
धुरकट दर्पणात
मळकट मुख दिसे
स्वच्छ काचेत चेहरा
सूर्यासम तेज असे…
*
सोळा शृंगार पाहूनी
पहा आरसा लाजतो
रूप सुंदरीचे तेज
जणू चंद्रमा भासतो…
*
वय सोळावे असता
बने आरसा सोबती
दर्पणात न्याहाळता
रूप गर्विता लाजती…
*
आरशात डोकावता
खुले ठेवा मनद्वार
नष्ट होती मुखवटे
निर्मळता आरपार…
☆
© डॉ. शैलजा करोडे (काव्यशलाका)
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈