सौ.ज्योत्स्ना तानवडे
कवितेचा उत्सव
☆ हे ध्वज देवा… 🇮🇳 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
☆
तूची आमुच्या अभिमानाचा ठेवा
वंदन असे तुजला हे ध्वज देवा ||
*
भारतमाता स्वातंत्र्याची तूच असे शान
तुझ्या दर्शने स्फूरण येऊनी उन्नत होई मान
तुझ्या रक्षणासाठी घडू दे सदैव उज्वल सेवा
वंदन असे तुजला हे ध्वज देवा ||
*
नभांतरी तू फडकत राहसी डौलाने
देशभक्तीने उर भरूनी ये अभिमानाने
शान तुझी लहरत राहो आशीर्वच द्यावा
वंदन असे तुजला हे ध्वज देवा ||
*
जतन तुझे पवित्र कर्म भान कर्तव्याचे
प्राणप्रणाने सदैव करणे रक्षण स्वातंत्र्याचे
अभिमानाचा तिरंगा जपू जाण जागृत ठेवा
वंदन असे तुजला हे ध्वज देवा ||
*
तुची आमुच्या अभिमानाचा ठेवा
वंदन असे तुजला हे ध्वज देवा ||
☆
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈