सुश्री अरुणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ व्यथा… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
(वृत्त- दिंडी)
☆
काय झाली हो चूक उभयतांची
एक पुत्रासी दूर धाडण्याची
स्वप्न एकच ते मनी जपुन होतो
प्राप्त करुनी यश पूत गृही येतो॥१॥
*
लेक भारी हो गुणी आणि ज्ञानी
अती लोभस अन् गोड मधुर वाणी
मान राखी तो वडील माणसांचा
गर्व नच त्यासी कधीही कशाचा॥२॥
*
काय जादू हो असे त्याच देशी
विसर पडतो का त्यास मायदेशी
परत येण्याचे नाव घेत नाही
जवळ वाटे का तोच गाव त्याही॥३॥
*
वदे आम्हासी का न तिथे जावे
“सर्व त्यजुनी का कसे सांग यावे
याच मातीतच सरले आयुष्य
याच भूमीतच उर्वरित भविष्य”॥४॥
*
नसे आम्हा तर अपेक्षा कशाची
पडो कानांवर खबर तव सुखाची
वृद्ध आम्ही रे आश्रमात जावे
एकमेकासह सुखाने रहावे॥५॥
*
दुःख होते रे फार तुझ्यासाठी
कुठे आहे ती आमुचीच काठी
कथा आहे ही बहुतशादिकांची
हरवलेल्या त्या जेष्ठ बांधवांची॥६॥
☆
© सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈