श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
☆ आला श्रावण श्रावण / वेध माहेराचे… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
☆ आला श्रावण श्रा व ण ! ☆
☆
आला श्रावण श्रावण
सर पडे पावसाची
वस्त्र ल्याली अंगभर
मही हिरव्या रंगाची
*
आला श्रावण श्रावण
ऊन पावसाचा खेळ
पडे गळ्यात नभाच्या
कधी इंद्रधनूची माळ
*
आला श्रावण श्रावण
नद्या नाले ओसंडले
उंच उंच डोंगर दरीत
मग प्रपात गाते झाले
*
आला श्रावण श्रावण
सारे चराचर आनंदले
कंबर कसून कासकर
शेती कामाला लागले
*
आला श्रावण श्रावण
डोळे सयीत पाणावले
नव्या नवरीच्या मनी
वेध माहेराचे लागले
वेध माहेराचे लागले ….
☆
वरील “श्रावण !” कवितेतल्या शेवटच्या कडव्यात म्हटल्याप्रमाणे, नव्या नवरीला श्रावणात माहेरी जाण्याचे लागलेले वेध कसे असतील, ते सांगायचा प्रयत्न पुढील कवितेत !
☆ वेध माहेराचे ! ☆
☆
आला श्रावण श्रावण
ऊन ओथंबल्या सरी,
मोर नाचे आनंदाने
माझ्या दाटल्या उरी !
*
आला श्रावण श्रावण
साद येई माहेराची,
दारी उभी वाट पाहे
माय माझी कधीची !
*
आला श्रावण श्रावण
माहेराची हिरवी वाट,
वाटे भेटता सोयरे
होती आठवणी दाट !
*
आला श्रावण श्रावण
सख्या साऱ्या भेटतील,
“होतो सासरी का जाच?”
लाडे लाडे पुसतील !
*
आला श्रावण श्रावण
गौर साजरी करीन,
पुजून अन्नपूर्णेला
फेर सख्यांसवे धरीन !
*
आला श्रावण श्रावण
व्रत वैकल्याचा मास,
शुभ चिंतून साऱ्यांचे
करीन उपास तापास !
करीन उपास तापास !
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈