सुश्री अपर्णा परांजपे
कवितेचा उत्सव
☆ मनवारी… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆
☆
देव पहावा पहावा
देव नाचूनही गावा
देव मस्तकी धरावा
देव जीविचा विसावा…
*
देव दाट घनदाट
मोर नाचतो वनात
देव कस्तुरी नाभीत
देव आत आत आत…
*
डोळे पाहती कौतुक
जग सोहळे अप्रूप
डोळे आत वळवत
देव तेथेचि डोलत…
*
धुंद आनंदी आनंद
कसा वसे हा देहात
जेव्हा मन शांत शांत
चित्त एकाग्र अभंग….
*
“वारी” मनाची विरक्ती
नको देहाची आसक्ती
नसे वेगळी हो मुक्ती
“आस नाही” ही निवृत्ती….
*
नको वाट संसाराची
“मनवारी” या देवाची
कृतार्थता या जन्माची
आस सुफळ देवाची…
*
देव पहावा पहावा
देव नाचूनही गावा
देव मस्तकी धरावा
देव जीवीचा विसावा…
☆
🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹
(वारी म्हणजे “चालणे” व वारी म्हणजे “हरण कर” … एकच शब्द द्विअर्थाने)
© सुश्री अपर्णा परांजपे
कात्रज, पुणे
मो. 9503045495
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈