सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
कवितेचा उत्सव
☆ आल्या गौरी गं ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆
(भक्तिगीत)
☆
आल्या गौरी गं, महालक्ष्मी गं माहेरवाशिणी भादव्यात
लिंबा लोण गं, औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥ धृ.॥
*
उंबऱ्यावर माप ओलांडी किणकिण घंटारव त्यात
बालगोपाळ सारे आनंदी घरामध्ये हो चिवचिवतात
देखणी आरास पाहून हसती गौरी गं कश्या मनात
लिंबलोण गं, औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥१॥
*
देवघरात तेज पसरे लेकुरवाळ्या आल्या माहेरात
वस्त्र माळा गं, नवे शालू गं, दाग दागिने त्यांच्या गळ्यात
दूर्वा आघाडा सोळा पत्री ही फुल हार पहा सजतात
लिंबलोण गं, औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥२॥
*
फराळाचा ग केला थाट गेले सारे त्यांच्या पोटात
सोळा भाज्या ग कोशिंबिरीही पुरणाचे जेवण ताटात
चित्रांन्न साखर भात पंचपक्वान्न गौरींच्या थाटात
लिंबलोण गं औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥३॥
*
गोविंद विड्याचा मान त्यांना गं, पाणी ठेवले चांदी तांब्यात
त्यांच्या बाळांचे सारे कौतुक पाहून गाली पहा हसतात
गाठी घेऊन खिर कानवला नैवेद्याच्या दहीभातात
लिंबलोण गं औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥४॥
*
निरंजने गं, नंदादीप हे समया पहा तेजाळतात
सारी सुमने गंधाळलेली धूप दीप गं दरवळतात
लेकी निघाल्या सासुराला ग मोती हळूच ओघळतात
लिंबलोण गं औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥५॥
☆
© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈