श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ माय मराठी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
माय मराठी तुला हवा तो मान मिळाला
सरस्वतीने तुझ्या मस्तकी टिळा लावला
*
परंपरागत मराठमोळा
साज तुझा तर खराच होता
महाराष्ट्रातील किती पिढ्यांनी
तुझा गिरवला आहे कित्ता
ऐश्वर्याला तुझ्या खुलवण्या
इथे नांदल्या अनेक सत्ता
तुझ्या लाडक्या सहवासाने
समाज येथे सुखी नांदला………
*
जुन्या पुराण्या लोककलाना
सामर्थ्याने तूच जगवले
संतांनी तर भक्ती करण्या
मनोबलाने तुला निवडले
अमृतवाणी तुझी ऐकता
देवमुखातून तेज प्रगटले
तुझेच त्याना रूप भावले
कधीच नाही मार्ग बदलला…….
*
अविट गोडी तुझ्या लाघवी
रचने मधली
लळा जिव्हाळा माया ममता
यानी आहे तेजस झाली
समृद्धीच्या वाटेवरती
गती मतीने पुढे चालली
आता नाही चिंतित काही
वैभव आले तुझ्या रूपाला……..
*
कर्तृत्वाचा तुझा दाखला
सर्व जगाला माहीत झाला
तुझ्यामुळे जीवदान मिळाले
इतिहासाला
तुझ्या कीर्तीचा भगवा झेंडा
नित्य फडकला
राज्य हिंदवी स्थापायाचे
तेज लाभले तलवारीला………
*
आता नाही चिंता काही
प्रगती पथावर दौडायाची
आस लागली असे आम्हाला
शिखरावरती पोहचायाची
करू तयारी जबाबदारी
पूर्णपणाने पेलायाची
मानमरातब देऊ मिळवून
सदैव सुंदर महाराष्ट्राला………
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈