सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ रतनजी टाटा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
कर शिस्तीचा, देशाभिमानाचा
कर्मचाऱ्यांसाठी केला सक्तीचा
करद्वय जुळती आपसूक
भाव त्यांच्या प्रती कृतज्ञतेचा ||
*
सर केली उद्योगाची शिखरे
सर त्याची ना येतसे कोणाला
सर तुम्हास मानाचा मुजरा
सर कर्तृत्वाचा कंठी शोभला ||
*
मानव तुम्ही आदर्श देशाचे
जगात नारे उद्योजगतेचे
मान व कणा ताठच आमचे
रत्न आमच्या हे अभिमानाचे ||
*
वर तुम्हा त्रिदेवांचा लाभला
स्वतःसवे तो जगास वाटला
वर नेले भारतास आपल्या
कार्यातून तुम्ही आता उरला ||
*
रत न कार्यात पळभरही
घडले असे आजवर नाही
रतन नाव हे सार्थ करूनी
भारतमातेच्या मुकुटी राही ||
*
टाटा करतेय जग तुम्हाला
प्रेम ज्योतीच्या ओवाळून ताटा
टाटा रतन तुम्ही चिरंजीव
प्रगतीत तुमचा मोठा वाटा ||
*
पोरका झाला आता देश सारा
तुम्ही उद्योगाची माऊली तात
पोर का? वृद्धही जपती मनी
ऋण फिटेल ना शतजन्मात ||
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈