सुश्री त्रिशला शहा
कवितेचा उत्सव
☆ स्नेहमयी दिपावली… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆
☆
नभांगणातील तारे सारे
धरतीवरती जणू उतरले
दिव्यादिव्यांच्या रोषणाईने
आसमंत लख्ख उजळले
*
सणांचा हा राजा आला
दिपावली म्हणती त्याला
चैतन्याने फुलून आला
घराघरात उत्साह भरला
*
रांगोळ्यांनी अंगण सजले
दारावरती तोरण बांधिले
आकाशकंदिल वर झगमगले
चमचमणारे जणू नक्षत्र उतरले
*
बालगोपाळांची लगबग चालली
किल्ला बांधता मातीत रमली
चढाओढीने मावळ्यांनी सजली
फटाक्यांची आतिषबाजी फुलली
*
लाडू, करंजी, चकली खमंग
पंचपक्वान्नांचे भोजन
आप्तेष्टांची जमली मैफल
आनंदाचा सोहळा सुंदर
*
झेंडू फुलांचे सजले तोरण
तबकामधे उजळली निरांजन
घरोघरी लक्ष्मीचे पूजन
उत्साह अन् आनंदाचा क्षण
*
राग, द्वेष सारे विसरुनी
एकमेका शुभेच्छा देती
नात्यांमधूनी स्नेह जुळती
दिपावलीची हीच पर्वणी.
*
सर्वांना दिवाळी व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… 🪔🏮💐
☆
© सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈