श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 260
☆ नाही घाई… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
प्रीती सुमने नंतर दाखव नाही घाई
हळू प्रीतिचा वनवा पेटव नाही घाई
*
गुलाब आहे टवटवीत हा ओठी धरला
थोडा थोडा मधही चाटव नाही घाई
*
ओंजळीतुनी फुले आणतो आणि उधळतो
कधीतरी तू गजरा मागव नाही घाई
*
तुझीच इच्छा पूर्ण कराया येइल तेव्हा
मन भरल्यावर मजला पाठव नाही घाई
*
मातीवरती प्रेम कराया शिकून घ्ये तू
मग मातीवर डोके टेकव नाही घाई
*
देहाचे या वस्त्र मळाया नकोच आधी
त्या आधी तू शालू नेसव नाही घाई
*
ओठांवरती तुझ्या जेवढी आहे गोडी
त्या गोडीला मजला भेटव नाही घाई
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈