कवी सुहास रघुनाथ पंडित
☆ कवितेचा उत्सव ☆ पानोपानी वनोवनी – कवी सुहास रघुनाथ पंडित ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे
धून बासरीची येता माझ्या कानावर
नकळत डोळ्यांपुढे येई बन्सीधर
सरल्या आषाढाच्या धारा आला श्रावण मास
अवचित का गं होती
सांग मला असे भास
हुरहूर वाटे फार
मनोमनी एक आस
जिथे तिथे डोळा दिसे
मला माझ्या श्री निवास
प्राण आणून डोळ्यात वाट पाहते तयाची
जीव लावून जीवास जावे सवयही त्याची
कोण घालील फुंकर आता माझ्या मनावर
झाले वेडी मी म्हणती जगसारे जगभर
नाही समोर तयाचे
आज रूप जरी माझ्या
चित्र चितारण्या त्याचे
माझी अपुरी ही वाचा
उगवावा जन्मामध्ये दिसून सोनियाचा एक
त्याच्या दर्शनाने व्हावे माझ्या जन्माचे सार्थक
नाही गोकुळची राधा
नाही सखा श्री सुदाम
पण घालू कसा आता
माझ्या मनात लगाम
त्याचे रुपडे दिसावे म
नामध्ये हीच आशा
आळविण्या त्याला आता बोलू कोणती भाषा
हृदयाची भाषा माझ्या अधरी येईना
शामवर्ण मेघांचा हा मला जगू ही देईना
हरित जगात हरि भरून राहिला
पानोपानी वनोवनी त्याला मी पाहिला
© कवी सुहास रघुनाथ पंडित
सांगली मो. – 9421225491
(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)
प्रस्तुति – प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३ दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈