सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “स्वराज्य…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
दशके लोटली सात तरी तो स्वातंत्र्यलढा अजुनी गाजे
‘मला पहा अन फुले वहा ‘ या मनोवृत्तीचे तण अती माजे ।।
स्वतंत्र देशी स्वतंत्र आम्ही.. रुचे मना ते करूही धजतो
लोकशाहीचे नायक आम्ही.. कोण आम्हाला अडवू शकतो ।।
जो तो आहे स्वतंत्र तर मग.. का आम्हा चिंता इतरांची
आपले आपण फक्त पहावे, , जळो ना तिथे भ्रांत दुजांची … ।।
कामापुरते गोड आम्ही अन काम संपता पाठ करू
गरज आमची पडेल तेव्हा.. नन्नाचा पाढाच सुरु ।।
सहाय्य करण्या दुजा कुणाला सवडच नाही आम्हा मुळी
अन सहाय्य तेही कसे करावे.. भिन्न की आमची जातकुळी ।।
निधर्मी आमचे राष्ट्र म्हणविते.. आम्हास देणे-घेणे नाही
निधर्म म्हणजे धर्म सोडणे.. याविण अर्थच ठाऊक नाही ।।
शतक की आले एकविसावे.. तिकडे आम्हा झेपायाचे
यायचे जयांना त्यांनी यावे, इतरां मागे सोडायाचे ।।
राजधर्म हा असेच शिकवी.. कलियुगातली हीच स्थिती
नेते म्हणजे राजे येथे.. लोकशाही ती दिन अती ।।
राजा आणिक रंकामधली निशिदिनी वाढतीच दरी ती
एकाची नित चाले ‘प्रगती’.. दुज्या नशिबी अधोगती ।।
मर्कटहाती कोलीत तैसा स्वैराचारा जणू परवाना
दुर्दशेस या आम्हीच कारण.. उठवू न शकतो निद्रिस्त मना ।।
उठा उठा हो सामान्यांनो.. उशीर किती हा आधीच झाला
जागे व्हा.. तुम्ही सज्जच व्हा अन परजा आपल्या मनशक्तीला ।।
शक्ती एकजुटीची जाणून … मिळवा मतभेद की मातीला
स्वैराचारा शह द्या.. मिरवा जित्याजागत्या लोकशाहीला……..
मिरवा सशक्त स्व-राज्याला…… ।।
☆
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈