श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 263
☆ तोल जाणारच… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
सखीची भेट झाल्यावर तसा तर तोल जाणारच
नशा डोक्यात शिरल्यावर तसा तर तोल जाणारच
*
सखी आहे धुके आहे गुलाबी छान ही थंडी
सुन्या बागेत फिरल्यावर तसा तर तोल जाणारच
*
नशा आहे तुझ्या आतच असे तू फूल मोहाचे
फुले मोहाचि फुलल्यावर तसा तर तोल जाणारच
*
निघाली रात्र पुनवेची झळाळी ही पुन्हा गाली
मिठीतच चंद्र असल्यावर तसा तर तोल जाणारच
*
तुझी तर सवय झालेली अताशा एवढी आहे
घरी नाहीस म्हटल्यावर तसा तर तोल जाणारच
*
तसा तंटा बखेडाही कधीतर होत असतो ना
सखे तो तूच केल्यावर तसा तर तोल जाणारच
*
गुलाबाचेच मी काटे तसे तर पाहिले कायम
कळी धरलीय म्हटल्यावर तसा तर तोल जाणारच
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈