प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव
☆ .. भारूड… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
☆
मी अनरसे तळते बाई..
मी चकल्या पाडते बाई…
लई जाळीदार अनरसे त्यावर खसखस पेरली
अन् माझ्या नंदेने ती खसखस नेमकी हेरली..
अगंऽऽऽ नको खाऊ म्हंनलं, पन ऐकती कुठं
खसखसनं घेरली तिला न मंग मळमळ सुटं…मी….
*
चकलीची भाजणी लई खमंग लई चटकदार
काटेरी मसालेदार चकली लई लई काटेदार
ववा नि तीळ घातला पोट दुखू नये म्हनून
पनं ऐकती कुठं खाल्या की खनून खनून….
मंग व्हायचं तेच झालं की.. पळतीया परसदारी…
वळखा तुमीच काय म्हनून…?. मी
*
लाडूचा घेतलाय धसका तिनं आता नग नग म्हनती
पन दिसतांच गळतीया लाळ नि चार चार हानती
पोटातं बसलेत गच्च नि तळमळतोय आता जीव
अन् तिच्याकडं पाहून मलाच भरलंय् आता हिवं
काय करू बाई मी कसं ग करू..
ह्या नंदेचं त्वांड मी कसं ग धरू..
*
मी सांगते, सुमती पवार,
अन्न लोकांचं असलं तरी, पोट लोकाचं नाही…
बाई.. बाई. पोट सांभाळून खाल्लं पाहिजे की नाही…? नाही, विचार करून खाल्लं नाही तर… ? असे पोटाचे हाल, होतात बाई…
मी अनरसे तळते बाई… मी चकल्या पाडते बाई…
☆
© प्रा.सौ.सुमती पवार
नाशिक
(९७६३६०५६४२)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈