सौ. सुनिता जोशी
कवितेचा उत्सव
☆ जरी निसटले बरेच काही… ☆ सौ. सुनिता जोशी ☆
☆
जरी निसटले बरेच काही…
थोडे नवे गवसत गेले…
ओंजळ थोडी रिती झाली…
तरी झरे नवे बहरून आले…
*
असेच आले वादळ काही…
क्षणात कुणास घेऊन गेले…
नाती काही विरत गेली…
पण बीजांकुरही दिसू लागले…
*
खरे-खोटे दिसले काही…
सत्तेपुढे झुकून गेले…
विश्वासाची साथ बदलली…
तरी डाव नवा टाकून आले…
*
निखळ जगणे संपले काही…
स्वार्थीच सारे बनून गेले…
मानवतेची हाक हरपली…
पण नव्या जाणिवा दावू लागले…
*
वाईट-साईट संपावे काही…
गतवर्षाच्या संध्याकाळी…
माणुसकी ही जात उरावी…
नव्या वर्षाच्या गर्भाठायी…
☆
© सौ. सुनिता जोशी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
छान कविता