☆ कवितेचा उत्सव ☆ सांज ☆ श्री आनंदहरी ☆
तुला सांज वाटे आता नकोशी
उगवतीचा लागे लळा आगळा
त्यागू कसा शिणल्या पावलाना
आणू कुठूनी जन्म नवा वेगळा ।।
जन्मांस लाभे सावली अंताची ही
तरी जन्मता जीवनी पाश आहे
उगवण्या भास्करा लागते मावळाया
जिथे निर्मिती तेथ विनाश आहे ।।
उमलणे तिथे कोमेजणे आणिक
पालवीस सुकूनी गळूनी जाणे
निसर्गाचे देणे असे आगळे हे
अंकुरास वाढणे, वाळून जाणे ।।
जरी जाणती खेळ हा निसर्गाचा
बालपणा माया लाभते आगळी
तिरस्कार छळे नित वृद्धत्वासी
अशी जगाची या रीत ही वेगळी ।।
लागेल तुलाही कधी मावळाया
जाणीव तुजला तयाची ना आहे
पेरले आज जे,उगवते उद्याला
अंतरी विचार हा रुजवूनी राहे ।।
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈