सौ.ज्योत्स्ना तानवडे
☆ कवितेचा उत्सव ☆ मायबोली ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
मराठीचा आहे | मला अभिमान |
शारदेची शान | भाषा माझी ||
मायबोली गोड | जीवा वेड लावी |
अंगाईची ओवी | माऊलीची ||
मनातील गूज | जात्यावरी गाते |
आपसूक येते | ओठी माझ्या ||
कथा भागवत | ओवी ज्ञानेशाची |
ठेव अमृताची | अलौकिक ||
मनाच्या श्लोकात | गीतेच्या अर्थात |
कथा कवितात | सार आहे ||
मराठीत आहे | साहित्याचा ठेवा |
जपोनी ठेवावा | मनोभावे ||
भाषा माऊलीची | आहे ओघवती |
देवी सरस्वती | सार्थ बोले ||
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈