श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ संत गजानन महाराज..! ☆
☆
भारतीय हिंदू गुरू,
शेगावीचे गजानन.
बुलढाणा जिल्ह्यातील
असे जागृत सदन.
*
वर्ण तेजस्वी तांबूस,
सहा फूट उंच योगी.
तुरळक दाढी केस,
दिगंबर संत जोगी.
*
दिगंबर अवस्थेत ,
केले व्यतीत जीवन.
जीव शिव मिलनात,
समर्पित तन मन.
*
सर्व सामान्यांचे खाणे,
हाच त्यांचाही आहार.
नाही पक्वानाचा शौक,
अन्न जीवनाचे सार .
*
कधी हिरव्या मिरच्या,
कधी झुणका भाकर .
अंबाडीची भाजी कधी,
कधी पिठाची साखर.
*
अंगणात ओसरीत,
भक्तालागी सहवास .
कधी भाकर तुकडा,
कधी कोरडा प्रवास.
*
जन जीवन सामान्य,
चहा चिलीम आवड.
भक्तोद्धारासाठी घेई,
जन सेवेची कावड.
*
सोडा गर्व अहंकार,
नको खोट्याचा आधार.
विघातक कर्मकांडी,
केला कठोर प्रहार.
*
शिस्त स्वच्छता शांतता ,
सेवाभावी सेवेकरी .
विधीवत पुजार्चना,
चिंता क्लेश दूर करी.
*
कथा सार उपासना,
गणी गण गणातला.
परब्रम्ह आले घरा ,
मंत्रजप मनातला.
*
गूढवादी संत थोर,
जणू अवलिया बाबा.
कधी गणपत बुवा,
घेती भाविकांचा ताबा.
*
हातामध्ये पिळूनीया,
रस उसाचा काढला.
कोरड्याश्या विहिरीत,
साठा पाण्याचा आणला.
*
कुष्ठरोगी केला बरा,
भक्ता दिले जीवदान.
गजानन योगियाचे ,
लिलामृत महिमान.
*
शिवजयंतीची सभा,
लोकमान्य गाठभेट.
गजानन भाकीताची,
मिळे अनुभूती थेट.
*
कोण कोठीचा कळेना ,
सांगे ब्रम्हाचा ठिकाणा .
परब्रम्ह मूर्त योगी,
असे शेगावीचा राणा.
*
शुद्ध ब्रम्ह हे निर्गुण ,
जग त्यातून निर्माण .
ब्रम्ह रस माधुर्याचा ,
योगीराज हा प्रमाण.
*
कर्म,भक्ती, ज्ञानयोग ,
योगशास्त्र जाणकार.
लक्षावधी अनुयायी,
घेती नित्य साक्षात्कार.
*
श्रेष्ठतेचा संतत्वाचा,
मठ संस्थानाचा खास.
समाधीस्त गजानन,
भक्ता लाभे सहवास.
*
कुशावर्ती नित्य भेट ,
केली पंढरीची वारी.
ब्रम्ह गिरी प्रदक्षिणा,
असे चैतन्य भरारी.
*
पंढरीच्या वारीमध्ये,
संत पालखी मानाची.
गावोगावी प्रासादिक,
कृपा छाया देवत्वाची.
*
लिला चरीत्र कथन ,
गजानन विजयात.
दासगणू शब्दांकीत,
ग्रंथ पारायण ख्यात.
*
आधुनिक संत श्रेष्ठ,
घ्यावी त्याची अनुभूती.
शेगावीचा योगीराणा,
संतवारी श्रृती स्मृती.
–गण गण गणात बोते–
☆
© श्री सुजित कदम
मो.7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈