श्री विनायक कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ जसा मनाचा विचार असतो… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆
[वृत्त..वनहरिणी [मात्रा८+८+८+८=३२]]
☆
चार असतो जसा मनाचा तशी आपली असते दृष्टी
वास्तवतेचे भान विसरते कल्पनेतली दिसते सृष्टी
होकारार्थी भाव हरपतो नकारतेची कूस उजवते
असून नाती अवतीभवती एकांताची होते वृष्टी
*
जे नाही ते दिसते सारे डोळ्यांवरती असून पट्टी
आभासांच्या आकारांशी घट्टच जाते जमून गट्टी
दुर्जनतेशी छान मित्रता सज्जनतेशी वैर लाभते
स्नेहासमवे विरह येतसे सौजन्याशी होते कट्टी
*
साधकबाधक विचारांमध्ये सुरूच होते जंगी मुष्टी
भला असूनी जीव बिचारा उगाच होतो दुःखी कष्टी
उघड करावे विवंचनेला कशास नुसती गुंतागुंती
सत्संगाची साथ लाभता सुधारणेला मिळेल पुष्टी
☆
© श्री विनायक कुलकर्णी
मो – 8600081092
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈