☆ कवितेचा उत्सव ☆ गेला श्रावण ☆ श्री रवींद्र देवघरे ☆
वाट पाहुनी वाटे वरती थकले मधुबन,
रिमझिम आसव सरीत बरसुनि गेला श्रावण.
तृषार्त धरेची मृगातही ‘मृगया’ झाल्यावर,
तृषातृप्तिचे अमृत शिंपुन गेला श्रावण.
पाण्यासाठी दाहिदिशांना त्राहि-त्राहि तरी,
पाणवठ्याचे पाउल भिजवुन गेला श्रावण.
अंकुरण्यासाठी आसुसलेल्या अवनीला मग,
गर्भ-रेशमी हिरवा शालू देउन गेला श्रावण.
वृक्ष-वल्ली पशु-पक्षी सृष्टीतिल सगे-सोयरे,
पर्यावरणाचे निसर्ग नाते शिकवुन गेला श्रावण.
सृष्टीतील सर्वांच्या सह अस्तित्वा साठी,
‘राखा वसुधेचा मान’ बजावुन गेला श्रावण.
कालपरत्वे आज-उद्याचे जीवन जगवुन,
‘येइन पुढल्या वर्षी’ सांगुन गेला श्रावण.
© श्री रवीन्द्र देवघरे
नागपूर.
मो 9561117803.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈