प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव ☆ काटे कुटे पचवत…. ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
बाई असे ग कसे पायी चाळ बांधायचे
आणि साऱ्यांच्याच तालावर नाचायचे
आई बा च्या घरी ही धाकातच डोळ्यांच्या
आहे पोरीची ही जात नजरा साऱ्यांच्या…
भाऊ खेळी विटीदांडू आम्ही भातुकली
चूल बांधली गळ्यात पहा तेव्हा चिमुकली
खोटाखोटा भातपोळ्या खऱ्याच होतात
आणि तव्यावरती पहा चटके देतात….
विहिणी विहिणी भातुकलीत पहा भांडत
मानपान रूसवे फुगवे तेव्हा रूजतात
संस्कारांची घडीच काही अशी बसवली
मानेवरती दिले “जू” नि पहा हाकलली…
ओढ ओढ बैला तू गाडा संसाराचा
मिळो नाही मिळो तुला शब्द प्रेमाचा
बंड केले तर नाही, कुठे ही रस्ता
इथे कर किंवा मर काढना मग खस्ता…
जगी सारेच पुरुष पहा आहेत सारखे
बायको वाचून त्यांचे पहा थोडे ना धके
तरी चिरडली तिला पायातली वहाण
नशिबचं बायकांचे पहा आहे हो भयाण….
नाही मिळणार न्याय, इथे कधी ही
काटे कुटे पचवत….
वाहिल ही…. नदी…..
© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक
दि: ०९/०९/२०२०
वेळ: दुपारी ४:२५
(९७६३६०५६४२)
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈