☆ कवितेचा उत्सव ☆ असं जगणं ☆ श्री प्रकाश लावंड ☆
या ठेप्यावर थांबू दोस्ता
भूतकाळाकडं वळून बघू
शिवारात धावाधाव करू
धूळमातीत मळून बघू
उन्हात तळू पावसात भिजू
अंग माखून घेऊ चिखलात
काळ्या आईच्या कुशीत लोळू
बसून बघू हिरव्या मखरात
बहरलेल्या शिवारावर
फांद्यांच्या चवऱ्या ढाळून बघू
मधाचे पोळे हुडकत जाऊ
हावळा हुरडा कणसं खाऊ
चिंचा बोरं कैऱ्या भोकरं
दोन्ही खिशांत भरून घेऊ
गाभुळलेला रानमेवा
जिभेवरती घोळून बघू
घडीभर विहिरीत डुंबत राहू
काठावरनं मुटका मारीत राहू
सुरपारंब्या शिवणापाणी
दांडूनं विट्टीला कोलत राहू
वयाला डालू डालग्याखाली
जरा पोरांसारखं चळून बघू
संकटांच्या अंगावर धावून जाऊ
अडचणींना कोंडीत पकडू
घटाघटा पिऊ महापुराला
दुष्काळाला फासात जखडू
भिती दाखवून मरणाला
असं जगणं खळखळून जगू
© श्री प्रकाश लावंड
करमाळा जि.सोलापूर.
मोबा 9021497977
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈