कवी राज शास्त्री
☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 40 ☆
☆ थेंब … ☆
थेंबाला माहीत नव्हतं
कुठे कसं पडायचं
आभाळाने सोडल्यावर
कुणाच्या आश्रित व्हायचं…१
आला बिचारा खाली
वेग त्याचा मंदावला
असंख्य थेंबात मग
त्याला सहारा मिळाला…२
कुणी कुठे कुणी कुठे
याला गटार मिळाली
हवेच्या प्रचंड झोतात
याची दिशा बदलली…३
थेंब अवतरण्यापूर्वी
होता शुद्ध, निर्मळ
गटारात पडताच पहा
याच्या भोवती कश्मळ…४
सहवास महत्वाचा असतो
आचार तेव्हाच साधतो
जन्माने कुणीच नसतो श्रेष्ठ
कर्माचा वाटा, मोठा ठरतो…५
मला इतकेच, सांगायचे
राज हेच होते, खोलायचे
उच नीच श्रेष्ठ नि कनिष्ठ
यातून बाहेर सर्वांनी पडायचे…६
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈