? कवितेचा उत्सव ?
☆ स्वप्न देखणे ☆ श्री सोमनाथ साखरे ☆
पाऊस सरींचा चिंब पसारा
लडी मोकळ्या रेशीमधारा
चांदण्यात जणु भिजले मोती
थेंब टपोरे बरसत गारा…….
नभांगणी घननिळा प्रकटला
श्रावणमासी उन-सावल्या
उन्हे कोवळी पाऊस न्हातो
सोनसाखळ्या धम्मक पिवळ्या
नभ पाझरले भूमीत विरले
तडाग उदरी तुडुंब भरले
करीत खळखळ अवखळ निर्झर
कुशीत नदीच्या अलगद शिरले
इंद्र धनुची विभवून भिवई
कटाक्ष टाकी प्रेमभराने
उधाण यौवना नव्हाळ सरिता
गिरी-दरीतून गाते गाणे
गर्भगृही त्या तृप्त धरेच्या
अंकुरले बीज नवलची घडले
हिरवे हिरवे स्वप्न देखणे
निळ्या नभाला अवचित पडले.
© श्री सोमनाथ साखरे
१५.०५.२०२१
नाशिक०३.
मोबा.९८९०७९०९३३
≈ संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
छान कविता. श्रावणमासी हर्ष मानसी कविता आठवली.