श्री तुकाराम दादा पाटील
☆ कवितेचा उत्सव ☆ नाती ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
अवती भवती सगळी नाती उपरी होती
लुबाडणारी जमली टोळी जबरी होती
जरा तापल्या उन्हात आली वितळत गेली
बनावटीची सर्व खेळणी रबरी होती
वाटेवरती दबंगशाही दिसली नाही
एकामागे एक चालली बकरी होती
फसवे नकली मजूर होते कामावरती
पैशासाठी खोटी भरली हजरी होती
सोन्यासाठी इथे कशाला भटकत बसला
नीट बघा ना हीच बनावट गुजरी होती
निमंत्रणाचा सोस कुणाला नाही उरला
स्वागतातली मानवंदना छपरी होती
लग्नासाठी वेळ नेमकी योग्य वाटते
आज घडीला उपवर झाली नवरी होती
वरकरणी जे घडते ते तर नाटक आहे
या भक्तांची मेख आतली दुसरी होती
पाठीवरती थाप मारता हळहळले ते
नस हाताच्या खाली दबली दुखरी होती
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
नेहमीप्रमाणे सुंदर काव्य.