सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
? कवितेचा उत्सव ?
☆ श्रध्दांजली – वीर सावरकरांना.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
देश स्वातंत्र्यास्तव झगडला खरा हा योगी!
ते वीर सावरकर होतेच निस्वार्थी अन् त्यागी!
तो दुस्तर कारावास भोगला आनंदे त्यांनी!
देशास्तव वर्षे अकरा व्यतीत केली अंदमानी!
संसार सोडूनी मांडला देशभक्ती चा संसार!
आहुती दिली सुखाची या देशासाठी अपार!
समज दिली यमुनेला देऊनी उच्च विचार!
चिमण्या- कावळ्या सम नसे आपुला जगी संसार!
मन कठिण करी वज्रासम त्या भोगीता यातना!
परी कुसुमादपि कोमल व्यक्त करी भावना!
काव्यसंपदा ही जणू ठेवच दिली सर्वांना!
दाऊन दिले जगी अमर उदाहरण देशभक्तांना!
स्वातंत्र्योत्तर आली उपेक्षाच जरी पदरी!
ना खंत तयाची दाखवली जन दरबारी!
घेतला वसा समाजसेवेचा जो मनी!
उध्दारास्तव अखंड झटला तो मुकूटमणी!
प्रणाम माझे करिते मी,
त्या स्वातंत्र्य वीरा मन्मनी!
उंचावली ज्याने मान आपल्या,
भारत मातेची या जनी!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈