कवितेचा उत्सव
☆ ग़ज़ल – काय बोलू… ☆ सौ.मनिषा रायजादे पाटील ☆
सांग दुःखा मी तुझ्यावर काय बोलू
राख झालेल्या मनावर काय बोलू
पुसट झाल्या भाग्यरेषा सर्व माझ्या
भंगलेल्या प्राक्तनावर काय बोलू
आठवांनी चिंब केले काळजाला
सांजवेळी कातरावर काय बोलू
लपवले मौनामधे मी शब्द माझे
समजले नाही कुणावर काय बोलू
शोध माझाही मला ना लागलेला
तू कुठे आहेस यावर काय बोलू
मी उन्हाच्या काहिलीने त्रस्त झाले
गोठलेल्या पावसावर काय बोलू
काय येथे आपले आहे मनीषा
व्यर्थ उसण्या जीवनावर काय बोलू
© सुश्री मनीषा रायजादे-पाटील
मिरज .जि-सांगली
९५०३३३४२७९
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈