प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव
☆ कळी म्हणाली….. ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
कळी म्हणाली दुज्या कळीला उद्या आपण उमलू
शेवटची ही भेट आपुली….दुनिया आपण बदलू…
फुले होतील पहा आपुली होईल सुंदर माला
सुंदरशा त्या वधू वराच्या स्पर्श करू या गाला..
कदाचित ग जाऊ आपण जगजेठीच्या पायी
ललना ती सुंदर कुणी ग केसातच माळेल बाई
कृष्ण सख्याच्या गळ्यात शोभू होऊन सुंदर हार
माळतील ग गोपी सुद्धा सजे केशसंभार..
पराधीन ग जीवन आहे नाही आपुल्या हाती
तरीही वेली वरती फुले बघ गाणे मधुर ते गाती…
आनंदाचे व्रत आपुले.. जीवन त्यांच्या साठी
निर्माल्यच होऊन तयाचे भले होऊ दे माती
देवाचरणी गळ्यात अथवा पडो कुठेही देह
सेवा करणे ब्रीद आपुले तेच आहे ना प्रिय…
दारावर शोभती तोरणे.. वधुवरांच्या हाती
फुले मोगरा पहा माळूनी करवल्याही बघ गाती
फुले पाहता मुखकमले ही बघ ना कशी उमलती
सुगंध आणि मोद वाटणे आहे आपल्या हाती…
किती ते सुंदर कार्य आपुले सुखदु:ख्खाला असतो
लग्न असो वा असो ती ताटी तेथे ही आपण हसतो..
क्षणभंगुर हे आहे जीवन तरी मनी ना खंत
सुगंधीत हो माती,पडता.. मिळून होते खत…
आनंदाचा वसा असा हा नित्य पहा लाभावा
सेवा करता करता देह हा सार्थकीच लागावा
सेवा करण्या परते दुसरे महान नाही कार्य
झोकून देणे देह दुज्यास्तव….
साऱ्यांना वाटो… प्रिय…
© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक
(९७६३६०५६४२)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈