कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक
स्व शांताबाई शेळके
कवितेचा उत्सव
☆ खांब ☆ स्व शांताबाई शेळके ☆
(
बाईच्या ओठांआड दडलेले असते रडणे
वर वर हसणे आणि आतल्या आत कुढणे
आल्यागेल्यांचा सत्कार बाई स्वत: करते
घरभर वारे होऊन ती सतत फिरते
नवरा,मुले,सासू,सासरे तिलाच साद देतात
रात्रंदिवस तिचे विनामोबदला घेतात
आजाऱ्याच्या उशापाशी दिवा होऊन जागते
भल्या पहाटे उठून पुन्हा बाई कामाला लागते
‘ रांधा वाढा उष्टी काढा’ चे कपाळावर गोंदण
राबण्याचा गाव तिला लग्नात मिळाला आंदण
गोंदणात खुलत असतो सूर्य गंध टिळा
चार काळ्या मण्यांनीच साजरा दिसे गळा
तिच्या अहेव चुड्याआड मनगट असते घट्ट
‘ सारे मीच करीन’ तिचा जन्मजात हट्ट
कुशीत भार वाहुन देते वंशाचा दिवा
पुढच्या अनेक पिढ्यांसंगे तीच जुळविते दुवा
भुईत पाय रूजवून ती आभाळात फुलते
देहाचाच खांब करून अवघे घर तोलते
चित्र साभार – Shanta Shelke – Wikipedia
स्व. शांताबाई शेळके
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈