स्व. दत्ता हलसगीकर
(जन्म 7 ऑगस्ट 1934 – मृत्यु 9 जून 2012)
कवितेचा उत्सव
☆ भूतकाळाचा पिसारा ☆ स्व. दत्ता हलसगीकर ☆
भूतकाळाचा पिसारा फुलवून नाचलेले मोर
आता थकून गेले आहेत
आणि भविष्य तर थिजून गेलेले, आता
निर्माल्यावर पाण्याचा शिडकावा करून
आम्ही फुले टवटवीत करतो, त्या म्लान गंधातही हरवतो…
वसंत ऋतूच्या गोष्टी बोलताना किती हळुवार होतो आम्ही !
कष्ट उपसलेल्या रेषांचे हात ती दाखवते,
स्वप्ने थिजल्या माझ्या मोतीबिंदुच्या डोळ्यात ती डोकावते
विरळ झालेल्या तिच्या रुपेरी केसांना पाहून मी गहिवरतो.
माझ्या छातीवर सांडलेल्या तिच्या काळ्याभोर केसांचा पाऊस आठवतो.
माझ्या बरोबर चालताना थकून थकून गेलेल्या
तिच्या पावलांना मी रोज रात्री तेल चोळतो तेव्हा ती पोटभर रडते,,,,
उसवलेल्या माझ्या आयुष्याला तिने किती वेळा रफू केले..
या आठवणीच्या उमाळ्याने मी जवळ घेतो
तेंव्हा सुरकुतलेल्या तिच्या निस्तेज गालांवर लाली चढते.
उन आणि पाऊस, सकाळ आणि संध्याकाळ
आता वसतीला आली आहेत,
घर आवरून झाले आहे; हाक आली की आता उठून निघायचे ||
स्व. कवी दत्ता हलसगीकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈