कवितेचा उत्सव
☆ सूर्योदय स्वातंत्र्याचा ☆ सौ. जस्मिन रमजान शेख ☆
छाताडावरी झेलूनी ‘वार’
ते धारातिर्थी पडले,
भारतमातेसाठी किती
स्वातंत्र्यवीर हे लढले… !!
कुणी पुत्र ,कुणी पिता
कुणाचा कुंकू भाळीचा,
मातेच्या स्वातंत्र्यासाठी
त्याग सर्व या नात्यांचा… !!
‘साखळदंडी’ पाहुनी माता
वीरपुत्रांची गर्जे ललकारी,
देऊनी आहुती सर्वस्वाची
मातेचा जयजयकार करी… !!
नका विसरू तरुणांनो,
गाथा शूरवीर रत्नांच्या,
सूर्यास्त करुनी प्राणांचा
सूर्योदय दिला स्वातंत्र्याचा… !!
एकात्मतेचा ध्यास धरुनी
प्रगतीने उंचवू आपली मान,
सातासमुद्रापार चला वाढवू
जननी ‘जन्मभूमीची’ शान… !!
© सौ. जस्मिन रमजान शेख
मिरज जि. सांगली
9881584475
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈