सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ रक्षाबंधन…☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
रक्षाबंधनाचा दिस
दिस बहीण भावाचा
वाट पहाते भावाची
दिस होईल सुखाचा ——-
भाऊ गं माझा लांब
सय दाटे या मनात
आकाशी जरी चंद्र
तरी भरती सागरात ——-
वाजे दारात पाऊल
हर्ष मावेना मनात
वाटे भाऊराया आला
मन धावे उंबऱ्यात ——
दिस सरला सरला
पाहू ग किती वाट
भाऊराया सये माझा
गुंतून गेला ग कामात —-
सांजवात ही लावली
उजळला ग देव्हारा
जरी दूर भाऊ माझा
इथे प्रेमाचा उबारा —–
सुखी ठेव देवराया
माझ्या भावाला सतत
इडा पीडा टळो त्याची
सदा राहो आनंदात
**************
—————- आणि याच भावना या अशा शब्दातही ———
राखी —-
हे मुळी बंधन नव्हेच–
तर हे एक चिरंतन प्रतीक —-
प्रतीक —–
बहीण भावावर करत असलेल्या —-
निरपेक्ष, निखळ, आणि अतिशय मनापासूनच्या
असीम प्रेमाचं —–
प्रतीक —–
“ देवा, माझ्या भावाला दीर्घायुष्य, निरंतर उत्तम आरोग्य, —
— अतीव सुख-शांती-समाधान, भरभरून आनंद–
— आणि सर्वतोपरी स्वास्थ्य दे —-” —
— या बहिणीच्या रोजच्याच प्रार्थनेचं —–
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈