सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ गोपाळकाला ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
हरी आला हो हरी आला
मम मन-अंगणी हरी आला
जमवून मनीचे सगे सोयरे
केला नि गोपाळकाला——
दया-क्षमा-शांतीच्या आणल्या
स्वच्छ शुभ्र या लाह्या
प्रेम नि सद्भावाचे जमले
दही त्यात घालाया——
खोड्या हरीच्या, खेळ मजेचे
लवण चिमूटभर त्यात
उगीच लपे अन उगीच पळे, मग
लटका राग ही मिरची त्यात—–
निरपेक्ष अशा मम प्रेमाचे
मग निरसे दूध घातले
सात्विक शुद्ध विचार-फळांचे
काप करून मिसळले ——-
स्वतःस विसरून कालविता हा
शुद्ध भक्तीचा काला
भान हरपले, न कळे हरीने
कधी तो स्वाहा केला ——
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈