कवितेचा उत्सव
☆ लेणी ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆
मनातील अर्जित भावनांची लेणी,
काळीज कोरतं स्वतःवर..
ही लेणी
सौन्दर्याने ओसंडून वाहणारी,
कधी गूढ वाटणारी…
तर कधी सहज सुंदर निरागस…
गच्च आशयांनी तृप्त,
लावण्यानी युक्त लेणी पाहून,
कुणी हसत फिदीफिदी,
कुणी मत्सराने पेटतो,
कुणाचा प्रयत्न मोडतोडीचा,
तर काहींचा त्या नष्ट करण्याचा…
असतात हातावर मोजणारेच,
त्याची किंमत समजणारे…
त्या मृदू काळजासारखे!
तरीही, सादर करत काळीज,
जीवंत कोरीव लेण्यांना…सर्वांपुढे!
पण.. नाही उतरवत कधीही स्पर्धेत,
कारण, ही जीवंत लेणी,
नसतातच स्पर्धेसाठी…
असतात ती अतीव सुंदर…
आपापल्यापरीने!
मग का तोलायचं-मोलायच त्यांना?
इतर लेण्याबरोबर?
रोजच कोरली जातात,
कमनीय लेणी!
प्रत्येक लेण्यांची सुंदरता
फक्त अनुभवायची!
दिवसेंदिवस…
काळजाने-
काळजाच्या गुहेत कोरलेली,
घडवलेली,
ती सुबक लेणी,
नक्कीच ऐतिहासिक होतील,
हा एकच विश्वास! काळजाचा…
© सौ अश्विनी कुलकर्णी
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
सुंदर प्रेममय रचना