सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ बाप्पा येती घरा ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
घेऊनी आता डोस लसीचे
चला आणूया गणरायाला
वाजत गाजत ढोल नि ताशे
सिद्ध होऊया स्वागताला
सडा शिंपुनी रेखू रांगोळी
तोरण बांधू दारात
माला सोडू सुमनांच्या
बाप्पा बसतील मखरात
जबाकुसुम शमी पत्री
लाडू मोदकाची गोडी
मनोभावे प्रार्थू गणेशा
वाहुनी ही दुर्वांची जुडी
आप्त स्वकीय सारे जमले
गाऊ आरती तालात
नाचू डोलू आनंदाने
झांजांच्या या गजरात
धूप दीप नैवेद्य अर्पूया
मिष्ठांन्नाने तबक भरूया
प्रसाद सेवना पंगत बसली
मुखी बाप्पा मोरया म्हणूया
आगमन झाले सुखकर्त्याचे
नकोच आता चिंता
कशास भ्यावे कोरोनास त्या
घरात असता विघ्नहर्ता?
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈