कवितेचा उत्सव
पुनरागमनायच श्री प्रमोद जोशी
कशा पताका धागा सोडून आल्या खाली!
त्याना कळले …….आनंदाचा गेला वाली!
फुटे हुंदका पाट रिकामा…..पाहुन मखरा!
उदबत्त्याना सहन होईना….गंधित नखरा!
जाण्यासाठी यावे हा का….नियम तुला रे?
निर्माल्यास्तव उमलुन यावे नियम फुला रे!
रांगोळीचे विस्कटणे हा…….भाव मनाचा!
परतीच्या गाडीत कोंबणे……भार तनाचा!
मूर्ती नव्हती कधी मानली……कुटुंबीय तू!
अश्रद्धेच्या श्रद्धा होता………..वंदनीय तू!
श्रीफळ आता एकाकी बघ……पाटावरती!
विसर्जनाने येई अवकळा…….काठावरती!
विरहाची ही नाही कविता…..अस्फुट टाहो!
निरोप कुठला?स्वागत घेण्या लौकर या हो!
पुन्हा रोजचे जगणे आणि…….खोटे हसणे!
मिटून डोळे बघतो पुन्हा…….मखरी बसणे!
साथ सोडुनी दुर्वा आल्या…….पाण्यावरती!
शोक तरंगे अता सुखाच्या……गाण्यावरती!
© श्री प्रमोद जोशी
देवगड.
9423513604
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈