श्रीमती उज्ज्वला केळकर
कवितेचा उत्सव
☆ “आई” – तीन अनुवादित कविता ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
[1]
कारगिलमध्ये हुतात्मा झालेल्या
मुलाची आई राष्ट्रपतींच्या हस्ते
मुलाचं ‘शौर्यचक्र’ घेण्यासाठी
मंचावर जात होती—–
तेव्हा कुणालाच माहीत नव्हतं
सरहद्दीच्या त्या बाजूच्या ज्या
सैनिकाच्या गोळीनं
तो हुतात्मा झाला होता,
तो सैनिकही शहीद झाला होता —–
कुठल्याशा एका गोळीने
या बाजूकडून गेलेल्या …
आणि सरहद्दीच्या
त्या बाजूला
त्याची आईदेखील
मंचावर चढत होती—–
आपल्या शहीद झालेल्या मुलाचा
सन्मान ‘निशान ए- हैदर’
घेण्यासाठी.
सरहद्दीच्या या बाजूला किंवा त्या —-
सैनिकांच्या आईच्या
स्थितीत वा नियतीत…
काहीच अंतर नसतं तसं——
[2]
सरहद्दीजवळच्या एका गावात राहणारी आई
एका सकाळी सहावीत शिकणार्या आपल्या मुलाला
पाच किलोमीटर अंतरावरील शाळेत पाठवताना,
दहा रुपयाची एक चुरगळलेली नोट त्याच्या खिशात ठेवत
त्याला समजावते—–
अचानक युद्धं सुरू झालंच
आणि शाळेमधून घरी पोचणं शक्य नाहीच झालं तर—-
जी पहिली गाडी किंवा टांगा त्याला मिळेल
त्यात बसून—
त्याने सरहद्दीपसून दूर—
शहरात किंवा कुठल्याही सुरक्षित स्थानी
निघून जावं—-
जिथे अधिकाधिक लोक
त्याला जाताना दिसतील,
अशा सुरक्षित ठिकाणी—–
असं सांगून आई आश्वस्त होते.
आणि बघता बघता तिची चिंता
निश्चिंततेत बदलून जाते——
[3]
विस्थापितांच्या छावणीत जन्म दिलेल्या मुलाची आई
त्याला अंजारताना- गोंजारताना एका बाबतीत समाधानी आहे—-
तिला वाटतंय —-
मुलाला भलेही विस्थापितांच्या ओझ्याखाली
अभावग्रस्त जीवन जगावं लागतंय , पण —-
पण आपल्या मुळापासून उखडून जाण्याच्या वेदनेशी मात्र —-
तो अपरिचित असेल—
आई जाणतेय—-
जाणतेय—-
असं मुळापासून उखडून जाणं—-
किती वेदनादायक असतं —–
मूळ हिन्दी कविता – कृष्ण शर्मा
मराठी अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈